नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील अर्थसंकल्प उद्या ५ जुलै रोजी मांडला जाणार आहे. त्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यावेळी २०१९-२० साठी देशाचा आर्थिक विकास दर ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजपा सरकार पुन्हा सत्तेत आले आहे. आधीच्या काळात संरक्षणमंत्री असणार्या निर्मला सीतारमण यांच्यावर यावेळी अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी संसदेत त्या अर्थसंकल्प सादर करतील.
निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पाहणी अहवाल मांडताना वित्तीय तूट ६.४ वरुन ५.८ आली असल्याची माहिती दिली. तसंच २०१९-२० मध्ये इंधन दर घटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. २०१९-२० साठी देशाचा आर्थिक विकास दर ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०१९-२०) आर्थिक विकास दर ६.८ टक्के होता. आर्थिक पाहणी अहवालात गुंतवणूक आणि विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.